पशुसंवर्धन व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासाठी सकारात्मक-उपमुख्यमंत्री अजित पवार
जैव सुरक्षा प्रयोगशाळा, राष्ट्रीय संदर्भीय लस चाचणी गुणनियंत्रण प्रयोगशाळा,
सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाचे उद्घाटन
पुणे: राज्यातील पशुपालकांना कृषी क्षेत्राप्रमाणे पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी दर्जा देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
पशुसंवर्धन विभाग अंतर्गत सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. औंध येथे जैव सुरक्षा स्तर-2 (बीएसएल-2) व स्तर- 3 (बीएसएल- 3) प्रयोगशाळा, राष्ट्रीय संदर्भीय लस चाचणी गुणनियंत्रण प्रयोगशाळा आणि सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, आमदार उमा खापरे, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे आदी उपस्थित होते.
आज उद्घाटन झालेल्या प्रयोगशाळा, रुग्णालय आदी सुविधा या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पशुधनाला उत्तम आरोग्यासाठी तसेच पशुधनापासून मिळणारे उत्पादन आणि उत्पन्नवाढीसाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त करून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, या सुविधांच्या निर्मितीसाठी 86 कोटी रुपये राज्यशासनाने खर्च केले आहे. देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक व्यवस्थित सुविधा महाराष्ट्राने या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाला योजनांसाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.
राज्यातील शेतकरी, पशुपालकांना पशुधनापासून व पशुपालनापासून येणारे उत्पन्न दुप्पट करावे. पशुसंवर्धनाशी निगडीत अनेक बाबतीत आपण देशात पुढे असले तरी अंडी उत्पादन व कुक्कुटपालनात सहाव्या-सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या क्षेत्रात आघाडीवर येण्यासाठी पशुपालकांना विविध सोयी, सवलती देणे आवश्यक आहे. आपल्याला पशुपालकांचे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ करायचे असून त्यांना आर्थिक बाबतीत सक्षम करायचे आहे.
प्रयोगशाळेत होणारे संशोधन आणि तेथे निर्मिती होणारी लस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अलिकडच्या काळात प्राण्यांपासून माणसांना अनेक आजार होतात, त्यामुळे याबाबतीतही अधिक संशोधन आणि लस निर्मिती होण्याची गरज आहे.
माणूस आणि प्राण्यांचे नाते ऐतिहासिक काळापासूनचे आहे. शेती आणि पशुपालनाच्या माध्यमातून माणसाने आपले भरणपोषण करण्याचा प्रयत्न केला आहे. हाच प्रयत्न आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा असून त्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाला चालना दिली जात आहे.
पशुसवंर्धन विभागात सर्वात पारदर्शक बदल्या झाल्याबद्दल आणि विभागाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच जीएमपी प्रमाणपत्र मिळाल्याबद्दलही पशुसंवर्धनमंत्री विभागाचे त्यांनी अभिनंदन केले. आरोग्याच्या दृष्टीने सर्वच बाबतीत स्वच्छतेला महत्त्व असून त्याचे पालन होणे गरजेचे आहे. प्लास्टिकबंदीसाठी आग्रही राहू असेही श्री. पवार यावेळी म्हणाले.