राजकीय

कृषी विद्यापीठांनी पिक उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे मॉडेल तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. राज्यातील कृषी विद्यापिठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचे मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. वातावरणीय बदल, कीड व्यवस्थापन, तसेच पावसाचा खंड पडल्यानंतरही तग धरू शकणारे वाण शेतकरी बांधवांना उपलब्ध देण्याबाबतचे संशोधन अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्यावतीने आयोजित संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या 53 व्या बैठकीचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.

यावेळी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, राहुल पाटील, रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर यांच्यासह कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. इंन्द्र मणि, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, संशोधक संचालक डॉ. खिजर बेग, डॉ. किशोर शिंदे उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत वसंतराव नाईक, महाराणा प्रताप यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने राज्यात आयसीआरच्या माध्यमातून सुरु केलेल्या नव्या योजनेत शेती सबंधित विविध शास्त्रज्ञ, या क्षेत्रात कार्यरत संस्था, अधिकारी एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाणार आहेत. संशोधक आणि शेतकरी यांच्यामध्ये या माध्यमातून एक नवीन नाते निर्माण होईल. या अंतर्गत पुढील पंधरा ते वीस दिवस एकात्मिक कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत असून, या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रापासून होत आहे ही महत्त्वाची बाब आहे. या माध्यमातून संशोधक एका दिवशी तीन ते चार गावांमध्ये जातील व शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधतील. या संवादातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेती क्षेत्राच्या विकासासाठी हाती घेतलेला हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुखमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

वातावरणीय बदलामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभा राहिली आहेत. बदलत्या तंत्राचा वापर करत गुंतवणूक आधारित शेती आपल्याला करावी लागणार आहे. संरक्षित शेतीसाठी शेतीमध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वातावरणीय बदलामुळे निर्माण होणाऱ्या पावसातील खंड सारख्या संकटात तग धरू शकेल, असे वाण विकसित करावे लागणार आहे. पावसाचा खंड, कीड व्यवस्थापन, वातावरणीय बदलात पावसाचा खंड आदी संकटात तग धरू शकणारे वाण विकसित करण्यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला कामे करावे लागेल तसेच शेती क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांनी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. हा वापर वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी ‘मिशन कृत्रिम बुद्धिमत्ता’ सुरु करावे. या माध्यमातून प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे नवे मॉडेल विकसित करावे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *